औंढा नागनाथ : येथील गावठाण जमिनीवर मुस्लिम समाजासाठी असलेल्या कब्रस्तानला तारांचे कुंपन लावण्याचे काम सुरू असताना दोन समाजात रस्त्याचा कारणावरून झालेला वाद तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी मध्यस्थी केल्याने तूर्त थांबला. दोन्ही गटांची सुनावणी घेवून जमीन मोजणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.औंढा नागनाथ येथील गट क्र. ३९४ ही सरकारी गावठाण असल्याने त्या जागेवर २००१ मध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. सदर जागेलगत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी व लिंगायत समाजाचीदेखील स्मशानभूमी आहे. २००६ मध्येही हे काम जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार थांबविण्यात आले होते. तेव्हा या कामाची मोजणी करूनच काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु आठ दिवसांमध्ये परत काम सुरू झाल्याने नगरपंचायत व तहसील कार्यालयात लेखी निवेदन देवून काम थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी तहसीलदार श्याम मदनूरकर नगरपंचायत मुख्याधिकारी मधुकर खंडागळे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, तलाठी माणिक रोडगे, नगरसेवक जकी काझी, शकील अहेमद, सतीश चौंढेकर व दोन्ही समाजातील प्रमुख नागरिकांना सोबत घेवून घटनास्थळाची पाहणी केली व याबाबत सविस्तर चौकशी करून परत मोजणी करून काम करण्याच्या सूचना मदनूरकर यांनी दिल्याने तूर्त हे काम थांबविले आहे. (वार्ताहर)
स्मशानभूमीच्या तारकुंपनाचा वाद
By admin | Updated: March 19, 2016 20:17 IST