औरंगाबाद: मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेकदा नदी किंवा तलावातील कचरा अडकल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण, एका मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले. एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप. माश्यांऐवजी साप पाहून मच्छीमाराची भंबेरी उडाली. यावेळी सर्पमित्र्याच्या मदतीने सापांची सुटका करण्यात आली.
ही घटना मंगळवारी विटावा शिवारातील तलावात घडली. मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात एक नव्हे तर वीस साप अडकले. साप पाहून मासेमारी करणाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर सर्पमित्रांना बोलवावे लागले. 20 पैकी 14 सापांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले, तर 6 सापांचा मृत्यू झाला.
जिवंत सापांना सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. विटावा गावात नदीमध्ये मासेमारी करणाऱ्या लोकांनी जाळे टाकले होते, त्यात जाळ्यामध्ये दिवड नावाचे साप अडकले. बालाजी बोईनवाड या स्थानिक नागरिकांच्या कॉलवरून मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी मंगळवारी सर्पमित्र मनोज गायकवाड, लक्ष्मण गायके यांना घटनास्थळी पाठविले आणि सापांची सुटका केली.