उस्मानाबाद : जातीअंत संघर्ष समिती, जाती अत्याचार विरोधक सत्यशोधन समितीचे प्रदेश सदस्य सुबोध मोरे यांनी शनिवारी अनसुर्ड्याला भेट देऊन तेथील पिडित कुटुंबे व ग्रामस्थांशी चर्चा केली. अनसुर्डा येथील प्रकरण हाताळताना प्रशासनाकडून कानाडोळा झाल्याचे प्राथमिक मत मोरे यांनी यावेळी नोंदविले.अनसुर्डा येथे २८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक संपताना काही जणांकडून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. मात्र पोलिसात तक्रार का दिली? या कारणावरून तेथील नऊ बौद्ध व दोन मातंग कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे बैठक घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटविले आहे. दरम्यान गावात पोलीस बंदोबस्त असला तरी, पोलिसांची गाडी दलितवस्तीजवळ न थांबता दुसरीकडे थांबविली जाते. ज्या आरोपींना पोलिसांनी सोडून दिले. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक होते. परंतु पोलिसांनी तसे केले नाही. याबरोबरच जे आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर बालगुन्हेगार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी नोंदविले. मोरे यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहितीही घेतली. संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर याबाबतचा सत्यशोधन समिती अहवाल मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाना लवकरच पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँ. मोहन शिंदे, तानाजी वाघमारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनसुर्डा प्रकरणाकडे प्रशासनाचा कानाडोळा
By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST