वैजापूर : ज्याचा माल त्याचीच हमाली या शासन निर्णयाची चोखपणे अंमलबजावणी करावी. तसेच खाजगी व्यापाऱ्यांकडून करण्यात येणारी अवैधरित्या वाराई वसुली थांबविण्याचे निर्देश देण्याची मागणी तालुका ट्रक चालक-मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याची ने-आण करण्याचे काम करणाऱ्या वाहतूकदारांकडून खाजगी व्यापारी लोड व अनलोडच्या नावाखाली सक्तीने वाराई आकारतात. वास्तविक पाहता या वाराईचा व वाहतूकदारांचा कोणताही संबंध नाही. मात्र, जबरदस्तीने ही वाराई वसूल करून ट्रकचालक-मालकांचे आर्थिक नुकसान केले जाते. याबाबत ज्याचा माल त्यानेच हमाली देण्याचा शासनादेश सप्टेंबर २०१६ मध्ये राज्य शासनाने बजावला आहे. मात्र या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने वाहतूकदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ट्रक चालक-मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंकर मुळे व कोपरगावचे अयुब कच्ची यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व बाजार समितीला निवेदन देण्यात आले आहे. यात त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच तालुक्यातील बाजार समिती व इतर ठिकाणी घेतली जाणारी ‘वाराई’ थांबविण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी मागणी केली आहे. यावेळी असोसिएशनचे राजेंद्र कोल्हे, श्रीकांत मापारी, सम्राट राजपूत, नारायण साठे, योगेश फुलारे, अशोक मुळे, ज्ञानेश्वर मुळे, भगवान मुळे, साहेबराव त्रिभुवन, राजू भगुंडे, सागर डिके, प्रदीप गलांडे, शेख अकिल, शेख हाफिज, शेख हमीद, इलियास शेख आदी उपस्थित होते.