फुलंब्री : औरंगाबाद - जळगाव महामार्गावर धावत्या कारला अचानक आग लागली. यात सुदैवाने जीवित हानी टळली आहे. कारचा समोरचा भाग जळाला असून, त्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ येथील अमोल भारुड हे आपल्या मित्रासोबत कार (क्र. एमएच २८ व्ही १९८१) घेऊन औरंगाबादला आले होते. रविवारी दुपारी भुसावळकडे परत जात असताना चौका घाटात वळण रस्त्यावर कारच्या समोरच्या भागाला अचानक आग लागली. कारमधील दोघे सुखरूप बाहेर पडले. अचानक लागलेल्या आगीमुळे चौका घाटात गोंधळ उडाला. येथून जाणाऱ्या अन्य वाहनधारकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कारचा समोरचा भाग जळाला होता. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
फोटो : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील चौका घाटात अचानक आग लागलेल्या कारची झालेली अवस्था.