औरंगाबाद : सिनेस्टाईलने टॅक्सीचालकाकडून त्याचीच टॅक्सी हिसकावून घेतल्यानंतर त्याचे अपहरण करून घेऊन जाणाऱ्या आरोपींनी पादचारी वृद्धाला कारची धडक दिली. या घटनेत त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात जिन्सी आणि क्रांतीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रहिवासी गणेश अर्जुन वैद्य यांची टॅक्सी कार (क्रमांक एमएच-२० व्हीटी-७६०९) आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना कॉल आल्याने ते टॅक्सी घेऊन बाबा पेट्रोलपंपाकडे गेले. बाबा पेट्रोलपंप चौकाकडून तो क्रांतीचौकाकडे जात असताना मोटारसायकलस्वार दोन जण त्यांच्या कारसमोर आडवे झाले.यावेळी त्यांनी गणेश वैद्य यांना चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांना चालकाच्या सीटवरून ढकलून कार ताब्यात घेतली. त्यांना बळजबरीने शेजारी बसवून आरोपी कार घेऊन भरधाव वेगाने रोशनगेटमार्गे जाऊ लागले. त्याच वेळी शेख अजीज शेख छोटे (७०, रा. युनूस कॉलनी) हे प्रार्थनेकरिता मशिदीच्या दिशेने पायी जात होते. याप्रसंगी कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी शेख अजीज यांना जोराची धडक दिली. अजीज हे घटनास्थळीच ठार झाले. या अपघातानंतर त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी मृताचा मुलगा शेख शकील शेख अजीज यांच्या तक्रारीवरून टॅक्सीचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी शाहरुख ऊर्फ शेख दाऊद निजामुद्दीन (३०, रा. युनूस कॉलनी) आणि शेख फरहान शेख सरवर (२२, रा. कटकटगेट) यांना पोलिसांनी अटक केली आहे.टॅक्सीचालक गणेश वैद्य यांना बळजबरीने टॅक्सी कारमध्ये कोंबून त्यांची कार चोरून नेल्याप्रकरणी आरोपी शाहरुख ऊर्फ शेख दाऊद निजामुद्दीन (३०, रा. युनूस कॉलनी) आणि शेख फरहान शेख सरवर (२२, रा. कटकटगेट) यांच्या विरोधात रात्री उशिरा क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी लूटमारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कार हिसकावली.... अन् वृद्धाला चिरडले
By admin | Updated: May 19, 2015 00:53 IST