जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची मागणी
---
औरंगाबाद : जिल्हा मुख्यालयातून इतरत्र प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करा. तसेच मुख्यालयातील रिक्त पदे भरा. पदोन्नतीची सर्व रिक्त पदे भरावीत, मुख्यालयात परिचर पदे कमी असल्याने प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सामाजिक न्याय भवनात घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, सचिव प्रदीप राठोड, कार्याध्यक्ष अजय बोधनकर, कोषाध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी निवेदन सादर केले व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचा पाढा वाचला. कार्यालयीन स्टेशनरी उपलब्ध नसल्याने कर्मचारी खिश्यातून गेल्या दहा-बारा वर्षांपासून खर्च करत आहेत. कामाचा व योजनांचा वाढलेला व्याप, ताणामुळे कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीकडे वळत आहेत. तर महत्त्वाच्या विभागात काम करण्यास तयार होत नाही. त्यामुळे अद्ययावत संगणक प्रणाली, झेराॅक्स, प्रिंटर, इंटरनेटची चांगली व्यवस्था कार्यालयात निर्माण व्हावी. कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ तातडीने मिळावेत. निवृत्ति वेतनासाठी वेळेवर अनुदान उपलब्धीसाठी प्रयत्न व्हावेत तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी कामे करण्यासाठी थेट कर्मचाऱ्यांना भेट, संपर्क टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.