बीड : बियाणे- खते, औषधी विक्रीसाठी कृषीची पदवी नुकतीच बंधनकारक केली होती. ही अट अन्यायकारक असल्याचा दावा करुन शिथील करण्याची मागणी कृषी विक्रेत्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ८० टक्के विके्रत्यांना झळ सोसावी लागणार असून या निर्णयाचा पुर्नविचार कराण्याची मागणी अ. भा. कृषी साहित्य विके्रता संघटनेचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी केली. या निर्णयाने खेड्यात व्यवसाय करणे अवघड होणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध देशपातळीवर संघटना एकत्र येऊन लढा देत आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह, भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन संघटनेने कृषी विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या आहेत. याउपरही पदवीधरची अट रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. कृषी विक्रेत्यांमार्फत पीकविमा योजना राबवली तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचेल असे सांगून मातीपरीक्षणकेंद्र गावोगावी उभारण्याची मागणीही कलंत्री यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विक्रेते संघटना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमोद निनाळ, जगदीश मंत्री व कृषी विक्रेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘पदवीधरची अट रद्द करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:20 IST