जालना : जिल्हा परिषदेतील अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीची तरतूद उपकर कार्यालयीन खर्चामधून करण्यात आली आहे.गतवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कॉर्पोरेट लूक देण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था अत्यंत सुटसुटीत झाली. मात्र या विभागामध्ये संगणक संच, झेरॉक्स मशीन, स्कॅनर आदींची उणीव जाणवत होती. संगणक संच अपूर्ण होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासकीय कामे वेळेत पूर्ण करणे अशक्य होते. ही अडचण लक्षात घेता उपकर कार्यालयीन खर्चातून या सुविधांवरही तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाकडे गतवर्षी जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. या विभागात कर्मचारी संख्या पुरेशी असली तरी कामांमध्ये विलंब झाल्याचे प्रकारही गेल्या काही काळात जिल्हा परिषद सभांमधून सदस्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. त्यामुळे आता या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर कार्यालयीन वेळेत लक्ष ठेवता यावे, यासाठी उपकरातून जीपीएस कॅमेऱ्यांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यांद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवू शकणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात वेळेवर कामकाज आटोपण्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. हे कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार असून त्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी ४० खर्ु्च्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंबंधीचा ठराव नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडून तो मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे
By admin | Updated: August 7, 2014 23:35 IST