औरंगाबाद : जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करून तो दहापदरी करण्याचे नियोजन नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया या संस्थेकडे करण्यासाठी देण्यात आले आहे. त्या रस्त्याची पाच टप्प्यांतील मोजणी बुधवारी सुरू झाली. केपीएम या खाजगी संस्थेकडे रस्त्याची मोजणी, उतार, अतिक्रमणे आणि ४५ मीटर रुंदीमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती संकलित करण्याचे काम देण्यात आले आहे. दोन दिवसांत या रस्त्याचे काम संपणार असून, पुढच्या आठवड्यात बीड बायपासची मोजणी करण्यास प्रारंभ होणार आहे. येडशी ते औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़ मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ औरंगाबाद शहर चौपदरीकरणात येडशी ते औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित काम करण्यात येणार आहे. जालना रस्ता हा केम्ब्रिज शाळा ते नगरनाका, असा १४.५ कि. मी. लांब आहे. ४५ मीटर रुंदीचा दहापदरी रस्ता होणार आहे. बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होणार असून, हा प्रकल्प ८५० कोटींचा आहे. अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. जमीन अधिग्रहणामुळे कामात अडथळा निर्माण झाला असल्याने काम सुरू करण्यास उशीर होत असल्याचे नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या स्थानिक कार्यालयाकडून सांगण्यात आले. जालना रोडच्या प्रस्तावित रुंदीकरणात ३ भुयारी मार्ग, ५ फूट ओव्हरब्रीज आणि ५ उड्डाणपुलांचा समावेश आहे.
रुंदीकरणासाठी जालना रोडची मोजणी
By admin | Updated: June 30, 2016 01:24 IST