लोकमत चमू , लातूरघरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर अनेकांचा व्यवसाय तेजीत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सिलिंडर संपल्यावर खरेदीसाठी नियम दाखविणाऱ्या यंत्रणेकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. शासनाने घरगुती वापरासाठी व व्यवसायासाठी अशा दोन प्रकारचे सिलिंडर बाजारात आणले आहेत. व्यवसायासाठी वापरण्यात येणारे सिलिंडर महाग असल्याने बहुतांश जण घरगुती वापराचा सिलिंडर वापरत असल्याचे उघडकीस आले आहे. ‘लोकमत चमू’ने शनिवारी लातूर शहरातील विविध भागांत केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला आहे. नियमावर बोट ठेवून उत्तरे देणाऱ्या प्रशासनाला या व्यवसायिकांनी चपराक दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा वापर सर्वसामान्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्राहक संख्या वाढल्याने त्याची मागणीही वाढली आहे. ज्या कुटुंबांचा वापर कमी आहे, अशा ग्राहकांना वेळोवेळी पुरवठा करण्याच्या निमित्ताने काही दलाल घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करतात. व्यवसायिक सिलिंडर हे महाग असल्यामुळे बहुतांश जण ते खरेदीच करीत नाहीत. काही ठिकाणी असे सिलिंडर नुसतेच देखाव्यासाठी ठेवण्यात आले आहेत. शहरातील अनेक हॉटेलांमध्ये किचनपर्यंत कोणालाही एन्ट्री नसते. संबंधित ठिकाणचे कर्मचारीच किचनपर्यंत पोहोचतात. बाहेरच्या बाजूला व्यवसायिक वापराचे सिलिंडर ठेवून आतमध्ये मात्र घरगुती सिलिंडर सर्रासपणे वापरण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवर हातगाडे, काही छोट्या हॉटेलांमध्ये घरगुती सिलिंडर उघडपणे वापरण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारच्या वापरकर्त्यांवर पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाच्या नियमांना कोलदांडा दाखवीत सिलिंडरचा वापर सुरू आहे. विशेष म्हणजे उघडपणे घरगुती सिलिंडर वापरणाऱ्यांकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे.कुठे पडदा, तर कुठे उघडे !शिवाजी चौकात अंडरग्राऊंड असलेल्या एका हॉटेलात उघडपणे घरगुती वापराचे सिलिंडर लावून स्वयंपाक सुरू होता. अत्यंत रहदारी व पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या या हॉटेल चालकाला सिलिंडर वापराबाबत कसलीच भीती नाही. शहरात काही ठिकाणी उघडपणे, तर काही ठिकाणी सिलिंडर झाकून घरगुती सिलिंडरचा वापर सुरू आहे.प्रशासनाचे दुर्लक्ष...घरगुती वापराचे सिलिंडर व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येत असल्याचे ‘लोकमत चमू’च्या पाहणीत आढळून आले आहे. काही खानावळींमध्येसुद्धा सर्रासपणे घरगुती वापराचे सिलिंडर वापरण्यात येतात. विशेष म्हणजे मोठ्या हॉटेलांमध्ये किचनपर्यंत कोणीच पोेहोचत नसल्याने त्या ठिकाणी नेमके कोणते सिलिंडर वापरण्यात येतात, याची चौकशी होणे गरजेचे आहे. पुरवठा विभागाकडून या संदर्भात पाहणी केली जात नसल्याने रस्त्यांवर उघड्यावर घरगुती वापराचे सिलिंडर वापरण्यात येत आहे.
घरगुती गॅसवर व्यावसायिकांची वाफ !
By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST