औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे. पाच महिन्यांत बजेटचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे चित्र स्पष्ट झाले आहे. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी अवस्था पालिकेची झालेली आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बजेट, उत्पन्न, करवसुली, खर्च आणि विकासकामांवरून झालेल्या चर्चेअंती सगळेच सत्य बाहेर आले. मनपाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना विकासकामे ठप्प असल्यामुळे नगरसेवकांनी मोठा धसका घेतला आहे. कामे झाली नाही तर मतदारांना काय उत्तरे द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत नगरसेवकांनी कधी नव्हे इतक्या पोटतिडकी आणि आक्रमकतेने लेखा विभागाचे नियोजन आणि वसुलीचा आढावा घेतला. ४मालमत्ता करवसुलीतून १३० कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाने गृहीत धरले आहे. २३ टक्के वसुली मनपाने केली आहे. अ प्रभागातून ६, ब मधून ७, क मधून १ कोटी ९९ लाख, तर ड मधून ७ कोटी, ई मधून ७५ लाख, तर फ मधून ९ कोटींचा पालिकेने कर वसूल केल्याचे अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. यामध्ये ५ कोटी पाणीपट्टीचे आहेत. वेतनाइतकी रक्कमदेखील करवसुलीतून विभागाने संकलित केली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. ४प्रभाग अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून बैठकीत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी याप्रकरणी खुलासा करताना इतर मनपाचे अनुभव सांगितले. प्रभाग अधिकाऱ्यांनी बैठकीला यावे यात दुमत नाही; परंतु सर्वांनी उपस्थित राहावे अशा सूचना विभागांच्या नसतात.४ वॉर्ड समिती आणि विषय समितीच्या नियमित बैठका झाल्या, तर नगरसेवकांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यांच्या या खुलाशावरून नगरसेवक संतापले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अतिरिक्त आयुक्तांनी करू नये, असे नगरसेवक तुपे म्हणाले.
बजेटचा बट्ट्याबोळ !
By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST