वैजापूर : जमिनीच्या अकृषक परवान्याचा आदेश देण्यासाठी महिलेकडून साठ हजार रुपयांची लाच घेताना येथील तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात घडली. दिलीपसिंह पवार असे लाच स्वीकारताना पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. नाशिक येथील संध्या राहुल आमलेकर यांनी टुणकी शिवारात पेट्रोलपंपासाठी कैलास निकम यांची गट क्र. ९९ मधील १ एकर शेतजमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. शेतजमिनीचा व्यावसायिक वापर होणार असल्याने त्यांनी येथील तहसील कार्यालयात सदरील जमीन अकृषक करण्याचा प्रस्ताव २३ नोव्हेंबर २०१३ रोजी दाखल केला होता. या प्रस्तावासोबत त्यांनी विविध कार्यालयाची नाहरकत प्रमाणपत्रेही जोडली होती. परवाना मिळविण्यासाठी त्यांनी कोषागारात १५ हजार ५८९ रुपये जमा केले होते. दरम्यान, अकृषक परवाना देण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपिक दिलीपसिंह पवार हे टाळाटाळ करीत होते. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या या कारवाईमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदरील शेतजमिनीचा परवाना आदेश तयार करूनही तो तक्रारदाराला त्यांनी दिला नव्हता. या आदेशासाठी पवार यांनी साठ हजार रुपयांची लाच आमलेकर यांना मागितली होती. आमलेकर यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. त्यांच्या तक्रारीनुसार नाशिक येथील ५-६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी तहसील कार्यालयात सापळा रचून लाचखोर दिलीपसिंह पवार यास लाच घेताना रंगेहाथ पकडले.
वैजापूर तहसीलमधील लाचखोर लिपिक चतुर्भुज
By admin | Updated: September 12, 2014 00:29 IST