औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या (वॉटर/गटार) ‘बड्या’ संचिकांना ब्रेक लावला आहे. समांतर जलवाहिनीची योजना आणि भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनने बहुतांश वॉर्डातील संचिका तुंबविल्या आहेत. विधानसभेनंतर मनपाच्या निवडणुका आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी मनपाच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता २० आॅगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे.आॅक्टोबरपर्यंत आचारसंहिता राहील. त्यामुळे २० आॅगस्टपर्यंत जास्तीत कामांना मंजुरी मिळावी. या दिशेने नगरसेविका पालिका प्रशासनाकडे हेलपाटे मारीत असल्या तरी जलवाहिनी टाकण्याच्या आणि ड्रेनेजलाईनच्या मोठ्या खर्चाच्या संचिकांना प्रशासन मंजुरी देणे टाळत आहे. वर्ष २०१३-१४ च्या बजेटमध्ये मनपाने पाणीपुरवठा विभागासाठी ५१ कोटी रुपयांचा खर्च केला. अंदाजे १५ कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. गतवर्षी ड्रेनेजलाईन व देखभाल दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद होती. भूमिगत गटारचे काम होणार असल्यामुळे या खर्चाला फाटा देण्यात आला आहे, तर समांतर जलवाहिनीचे काम होईल, अशी अपेक्षा असल्यामुळे नवीन जलवाहिन्यांची कामेही थांबविण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या परिस्थितीत समांतर योजना कधी होणार, याचा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आयुक्त म्हणाले...जी महत्त्वाची कामे आहेत व छोटी-छोटी कामे आहेत. त्यांना मंजुरी दिली जात आहे.भूमिगतचे काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे वारंवार एकाच कामावर खर्च होऊ नये यासाठी विचार करून निर्णय घेतले जात आहेत, असे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक म्हणतात...नगरसेवक कृष्णा बनकर म्हणाले की, माझ्या वॉर्डातील ड्रेनेजलाईनच्या संचिका थांबविण्यात आल्या आहेत. प्रशासनाला विचारले असता, भूमिगत गटार योजनेमुळे मोठी कामे थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दुष्परिणाम असा... भूमिगतचे उद्घाटन जरी झाले तरी काम पूर्ण होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत ड्रेनेजलाईन देखभाल दुरुस्तीवरच पालिका लक्ष देणार का? असा प्रश्न आहे. या सगळ्या कारभारामुळे मनपाचे इंजिनिअरिंग कोलमडेल. त्याचे दुष्परिणाम सध्याची यंत्रणा ठप्प होण्यावर होतील. समांतरचे काम सुरू होईल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे नागरिक लोकवर्गणीतून जलवाहिन्या टाकून घेत आहेत. गेल्या आठवड्यात गजानननगर भागामध्ये नागरिकांनी जलवाहिनी टाकून घेतली.
‘बड्या’ संचिकांना बे्रक!
By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST