हिंगोली : मतदारसंघात युती व आघाडी तुटल्यामुळे पारंपरिक लढतच होईल, अशी शक्यता बळावली होती. मात्र पक्षांनी आपला बाणा कायम ठेवल्याने पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक होत आहे. हिंगोलीत कॉंग्रेसचे उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची उमेदवारी अंतिम असल्याने ते सर्वात अगोदर तयारीला लागले होते. आता प्रचार प्रारंभ करण्यात त्यांनी आघाडी घेतली. गावोगाव प्रचाराचा झंझावात सुरू केला. सुरुवातीपासूनच इतर एकाही पक्षाची उमेदवारी जाहीर होत नसल्याने संभ्रम वाढत गेला होता. ही जागा भाजपाच्या कोट्यात असतानाही भाजपाचे तान्हाजी मुटकुळे यांना शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीसाठी ताटकळत बसावे लागले. तर राकॉं व सेना यावेळी नव्यानेच विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण व शिवसेनेचे दिनकरराव देशमुख हे उमेदवार आहेत. दिलीप चव्हाण हे हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तर देशमुख हे बाजार समितीचे माजी सभापती आहेत. याशिवाय माजी आ.बळीराम पाटील कोटकर यांनी आपला नातू ओम कोटकर यांना मनसेकडून रिंगणात उतरवले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच हत्तीची टक्कर होत असताना इतरही अनेक जण लढायला उत्सुक आहेत. वाढलेल्या उमेदवारांमुळे आपल्या वैयक्तिक, समाज अथवा पक्षाच्या बळावर संधी मिळेल, अशी आशा बाळगून या इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे.मागील पंधरा वर्षांत मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास- कामांच्या बळावर आ. गोरेगावकर हे मते मागत आहेत. तर दिलीप चव्हाण यांनी आपल्या शहर विकास कामांची माहिती देत पक्ष संघटनेच्या बळावर मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. तान्हाजी मुटकुळे यांनी भावनिक साद घालून जि.प.तील आपल्या कार्यकाळाची आठवण करून देण्याचे काम सुरू केले आहे. दिनकरराव देशमुख यांनीही आपल्या जि.प.तील कामांशिवाय पक्षाच्या जोरावर मतदारांना साद घालण्याचे काम सुरू केले आहे. ओम कोटकर यांनी आपल्या आजोबांच्यार् काळातील कामांचा पाढा वाचणे सुरू केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
हिंगोलीत पारंपरिक लढतीला ब्रेक
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST