सुमोटो याचिकेवर आज सकाळी ११ वाजता
विशेष सुनावणी
खंडपीठाच्या आदेशाचा भंग; एसीपी वानखेडे यांनी लेखी माफी मागण्याचे आदेश
सुमोटो याचिकेवर आज विशेष सुनावणी : हेल्मेट सक्तीबाबतच्या आदेशावरून न्यायालयाचे निर्देश
औरंगाबाद : दुचाकी चालकांना हेल्मेट सक्तीबाबत खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्यामुळे येथील वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शुक्रवारी (दि. ७) लेखी माफी मागावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी गुरुवारी दिला.
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधांबाबतच्या सुमोटो याचिकेच्या ऑनलाईन सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या सुमोटो याचिकेवर ७ मे रोजी विशेष सुनावणी होणार आहे.
या सुमोटो याचिकेच्या सुनावणीदरम्यान ३ मे रोजी ‘शहरात हेल्मेट आणि मास्क घालण्याबाबत तसेच आधार कार्ड सोबत ठेवण्याबाबत खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशाची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले होते. यासंदर्भात किती गुन्हे दाखल केले, याचीही माहिती खंडपीठाने मागविली होती.
त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त वानखेडे यांनी ४ मे रोजी प्रेसनोट काढून, हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांविरुध्द कारवाईची मोहीम ५ मेपासून सुरू करण्यात येणार आहे, असे म्हटले होते. मात्र, लगेच हेल्मेट सक्तीची मोहीम ५ ऐवजी १६ मेपासून राबविण्यात येईल, असे जाहीर केले. याबाबतच्या बातम्या ५ मे रोजी प्रसिद्ध झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
आजच्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, औरंगाबाद महापालिकेतर्फे ॲड. संतोष चपळगावकर, हस्तक्षेपकातर्फे ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे, नांदेड महापालिकेतर्फे ॲड. राधाकृष्ण हिंगोले, परभणी महापालिकेतर्फे ॲड. धनंजय शिंदे आदींनी काम पाहिले.