औरंगाबाद - राजीवगांधीनगरातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक कशाचातरी स्फोट होऊन एकाच कुटुंबातील दोन जण ठार झाले आणि एक महिला गंभीर जखमी झाली. घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहे. स्फोटाच्या आवाजाने घटनास्थळ हादरले.
शारदा भावले (५०. रा. राजीवगांधी नगर), सूर्यभान कचरू दहिहंडे (५५.रा.वाळूज ) असे दोन्ही मयताची नावे आहेत तर सुमन दहिहंडे(५०. रा. मोहटा देवी, बजाजनगर )असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरेयांनी सांगितले की, सूर्यभान आणि सुमन हे हे बजाजनगरमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शारदासोबत सुर्यभान यांचे मैत्रिचे संबंध होते. शारदा यांना घर खरेदी करण्यासाठी सुर्यभानने पैसे दिले होते.शुक्रवार दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास दहिहंडे पती-पत्नी राजीव गांधीनगरातील शारदाच्या घरी गेले. घर नावे करून देण्याच्या मागणीवरुन त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी स्वयंपाकाच्या खोलीत अचानक कशाचातरी स्फोट झाला.
या घटनेत त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि तिघेही गंभीररित्या जळाले. या घटनेत शारदा घटनास्थळीच ठार झाली तर दहिहंडे पती-पत्नी गंभीर जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत शारदा, जखमी सुमन आणि सूर्यभान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे सूर्यभान यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी दिली.
जबाब नोंदविता आला नाहीघटनेनंतर गंभीर जखमी पती-पत्नींचा जबाब शुक्रवारी पोलिसांना घेता आले नाही. उपचार दरम्यान जखमी पतीचा मृत्यू झाला. पत्नी देखील मृत्यूशी झुंज देत असल्याने त्यांचाही जबाब नोंद करण्यात आले नसल्याने घरामध्ये तिघांमध्ये नेमकं काय घडलं, याबाबत अचूक माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याघटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास साहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते हे करीत आहेत.
बीडीडीएसकडून तपासणीस्फोटाची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र घटनास्थळी त्यांना आक्षेपार्ह काहीच आढळले नसल्याचे पो.नि. चंद्रमोरे यांनी सांगितले.