परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत बुधवारी आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडल्या. पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे पहिल्यांदाच या निवडणुकीत समोरासमोर आले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तळेगाव येथे सभा घेतली. अध्यक्षस्थानी नरसिंगराव सांगळे होते. आ.आर.टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, अॅड. यशश्री मुंडे, फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, बंकट कांदे, डॉ. शालिनी कराड यांची उपस्थिती होती. या सभेत पंकजा यांनी बाजार समिती कर्जमुक्त केल्याचा दावा सांगणाऱ्यांनी सुतगिरणी का वाचविली नाही? असा रोकडा सवाल उपस्थित केला. सुतगिरणीतून केवळ पहेलवान पोसले असून गुंडगिरीला खतपाणी घातल्याचा घणाघातही केला. सुतगिरणी बंद पडल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले, असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मारला. अॅड. यशश्री मुंडे यांनीही तोफ डागली. त्या म्हणाल्या, विरोधकांना पराभवाची हॅटट्रीक साधण्याची घाई झाली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी निर्भिडपणे साथ द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.धनंजय मुंडेंचा २४ कलमी जाहीरनामामागील चार वर्षात कारखान्यात गैरव्यवहार झाले असून चौकशीची मागणी करत श्वेतपत्रिका काढण्याचे आश्वासन देत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी २४ कलमी कार्यक्रम जाहीर केला. या जाहीरनाम्यात पहिल्याच क्रमांकाला संस्थापक स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक कारखानास्थळी उभारण्याचे वचन देऊन त्यांनी ‘गुगली’ टाकली आहे. शेतकऱ्यांसाठी आकर्षक योजनांचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी दैठणा, हाळम, हेळंब, धर्मापुरी, कासारवाडी, मांडवा, मरळवाडी, मिरवट येथे दौरा केला.(वार्ताहर)
परळीमध्ये धडाडल्या तोफा
By admin | Updated: April 23, 2015 00:49 IST