वाळूज महानगर : सेनेसोबत फारकत घेऊन वेगळी चूल मांडत भाजपने वडगाव- बजाजनगर ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती; मात्र, मतदारांनी यात भाजपचा अक्षरश: धुव्वा उडविला. या निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून १७ पैकी १५ जागा पटकावल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी व जनसुराज्य कामगार परिवर्तन विकास आघाडीचा सफाया झाला. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले, तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली.शिवसेना व भाजप या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. याशिवाय विविध पक्षांतील नाराज पदाधिकारी व काही सामाजिक व कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य कामगार परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल तयार करून सेनेला आव्हान दिले होते. गतवर्षी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांनी सहा ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे सेनेच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत अल्पमतात आली होती. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया यांनी प्रचारासाठी भाजपचा मोठा फौजफाटा आणला होता. सेनेने मावळत्या सदस्यांना घरचा रस्ता दाखवीत बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. प्रचाराच्या काळात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यामुळे कोण बाजी मारणार, याकडे वाळूज महानगरवासीयांचे लक्ष लागले होते.विजयी उमेदवारप्रभाग क्रमांक १- अरुण कचरू वाहुळे, चंदाबाई चंद्रकांत काळे व उषाबाई एकनाथ साळे. प्रभाग क्रमांक-२ मध्ये अमितकुमार अनिल चोरडिया, हौसाबाई वामन पाटोळे व वैशाली काकाजी जिवरग. प्रभाग क्रमांक-३ मध्ये मोहन रामभाऊ गिरी, रमाकांत संपतराव भांगे व अलका दिगंबर शिंदे. प्रभाग क्रमांक-४ मध्ये महेश हनुमानराव भोंडवे, सुरेखा अशोक लगड व संगीता दादासाहेब कासार. प्रभाग क्रमांक-५ मध्ये श्रीकृष्ण नारायण भोळे, सचिन कल्याण गरड व मंदा कैलास भोकरे, तर प्रभाग क्रमांक-६ मध्ये श्रीकांत सुभाष साळे व उषाबाई पोपट हांडे हे उमेदवार विजयी शिवसेनेना सोडून भाजपात गेलेले अनिल चोरडिया यांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चोरडिया यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती; परंतु त्यांचे पुत्र अमित चोरडिया वगळता त्यांच्या गटाचा एकही उमेदवार विजय मिळवू शकला नाही. ४त्यांच्या पत्नी ज्योती चोरडिया याही पराभूत झाल्या. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही. सेनेचे राजू दहातोंडे व सूर्यकला साळे यांचा निसटता पराभव झाला आहे.विद्यमान सरपंच छायाताई कारले, अरुणा गवळी, मंदा गाडेकर, लक्ष्मण लांडे, ज्योती चोरडिया, सविता आंबेकर, कल्पना सूर्यवंशी या ७ सदस्यांचा दारुण पराभव झाला. श्रीकृष्ण भोळे या एकमेव मावळत्या सदस्याचा या निवडणुकीत विजय झाला आहे. यावरून मतदारांनी प्रस्थापित सदस्यांना डावलून नवख्या सदस्यांवर विश्वास दाखविला असल्याचे दिसते.
भाजपचा धुव्वा
By admin | Updated: December 22, 2015 00:13 IST