उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. दुष्काळी अनुदानात हात आखडता घेतला, खताची सबसीडी काढून घेतली, रॉकेल अन् धान्याचा कोटाही कमी केल्याचे सांगत ही कार्यपद्धी अशीच सुरू राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनान मदत जाहीर केली. परंतु, ही मदत अत्यंत तोकडी आहे. शेतकऱ्यांच्या हाती हेक्टरी दोन ते अडीच हजार रूपयेही पडत नाहीत. त्यामुळे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे भाजप-सेना सरकारने खताची सबसीडीही काढून घेतली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबतही शासनाने फेरविचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वतीने (युपीए) केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, भाजपा-सेना सरकारने सत्तेत आल्याबरोबर धान्य वाटप बंद केले. आघाडी सरकार एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा करू शकत होते, मग सध्याचे सरकार हे का करू शकत नाही? असा सवालही त्यंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील शासनाने रॉकेलच्या कोट्यातही मोठी कपात केली आहे. ही कपात जवळपास ७२ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) राज्यातील ८ कोटी ७७ लाख केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्याची योजना तत्कालीन युपीए सरकारने सुरू केली. तर केंद्राकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना दोन रूपये किलोने गहू तर ३ रूपये किलोने तांदूळ दिला जात होता. महाराष्ट्र शासन दरमहा १२० कोटी खर्च करून उर्वरित १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांना प्रतिमहा १० किलो गहू व ५ किलो तांदूळ सवलतीच्या दरात देत होते. मात्र, भाजप-सेना सरकारने नोव्हेंबर महिन्यापासून १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांचे धान्य बंद केले. त्यामुळे राज्यातील २ कोटी जनतेच्या तोंडचा घास सध्याच्या सरकारने हिसकावला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख १६ हजार ८८६ एपीएल कार्डधारक आहेत. या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये गहू, तांदूळ मिळणे बंद झाले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
भाजपा-सेना सरकारचे धोरण शेतकरी विरोधी
By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST