रमेश कोतवाल , देवणी देवणी शहरात सध्या वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही जुने नादुरुस्त मीटर असल्यामुळे त्या मीटरमध्ये हेराफेरीचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी मीटर रीडिंग न घेताच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. देवणी शहरात २१०० च्या जवळपास ग्राहक आहेत. यापैकी ८०० मीटर्स हे आयआर कंपनीचे असून, त्याचे आकडे कर्मचारी घेतात. मात्र हे आकडे कॅमेर्यात घेतले जात नाहीत. याशिवाय ७०० मीटर चक्राकार पद्धतीने फिरणारे जयपूर कंपनीचे आहेत. यात मात्र १०० टक्के हेराफेरी करून फिरणार्या चक्राची गती कमी करून युनिट कमी करण्याचे प्रकार सर्रास केले जात आहेत. एका मीटरला हेराफेरी करण्याचा दर ३ हजारांपर्यंत आकारला जात आहे. तिसरा जुन्या मीटरचा प्रकार आहे. हे मीटर कालबाह्य झाले असून, ते एक तर चालत नाहीत. चालले तर डिस्प्ले गेल्याने आकडे दिसत नाहीत. शिवाय, यापैकी बरेच मीटर जळालेले आहेत. अशा मीटरची बिले महिन्याकाठी शंभराच्या आतच येत आहेत. विशेष म्हणजे असे मीटर एका गावातील वस्तीत मातब्बराच्याच घरात आहेत. असे मीटर बदलणे तर सोडाच, वीज कंपनीला हात लावणे पण अशक्य झाले आहे. गावातील मीटर बदलण्याचे टेंडर खाजगी कंपनीला दिले असल्याने मनमानी पद्धतीने मीटर बदलून परागंदा झाला आहे, आता वीज कंपनी गुत्तेदारावर ढकलत आहे. तर गुत्तेदार कंपनी मीटर देत नाही म्हणून मीटर बसवत नसल्याचे सांगत आहे. शिवाय, मीटर बसविणारे कुशल कामगार नसल्याने चुकीच्या पद्धतीने मीटर बसविल्याने बिलात तफावत येत आहे. अंदाजे बिल आकारणी... वीज मीटर व वीजगळती तथा वीजचोरीची प्रकरणे चालू असतानाच वीज कंपनी वीजबिल रिडींग घेण्याचे व वीजबिल वाटण्याची कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेते. सदरील कंत्राटदार मजुरीवर अकुशल मुले लावून रिडींग घेतात. पण सदरील रिडींग एका ठिकाणी बसून अंदाजे टाकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, सदरील प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक टोळीच सक्रिय असल्याची चर्चा देवणी शहरात आहे. याबाबत देवणी महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व्ही.एस. बाळापुरे यांच्याशी संपर्क साधला असता वीजबिलाचे काम खाजगी संस्थेला दिले असल्याने चुकीची बिले दिली जात असली तरी त्यात दुरुस्ती केली जात आहे.
तीन महिन्यांपासून रीडिंग न घेताच बिले !
By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST