आखाडा बाळापूर: घरगुती वापराचे थकित वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास येहळेगाव येथील दोघांनी १८ मार्च रोजी सकाळी १0 वाजता शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत वितरण कंपनीच्या आखाडा बाळाूपर शाखेचे कनिष्ठ अभियंता गणेश वैजनाथ खिल्लारे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत १८ मार्च रोजी सकाळी १० वाजता येहळेगाव तुकाराम येथे थकित वीलबिल वसुलीसाठी गेले होते. तेथे एका घरगुती ग्राहकाकडे १० हजार १० रुपयांचे थकित बिल होते. भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करावा लागेल, असे खिल्लारे म्हणाले. तेव्हा घरातून दोघे भाऊ बाहेर आले. सार्वजनिक रस्त्यावर अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ व थापडबुक्क्यांनी मारहाण केली. शर्टाचे कॉलर पकडून दहशत निर्माण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपी सदानंद दत्तात्रय धोबे, गजानन दत्तात्रय धोबेविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार ए.एस.वंजारी करीत आहेत. (वार्ताहर)
बिल वसुलीस आल्याने अभियंत्याला मारहाण
By admin | Updated: March 19, 2016 20:16 IST