औरंगाबाद : लाडक्या गणरायाला वाजत- गाजत आणि डी.जे.च्या तालावर नाचत मिरवणूक काढून सोमवारी निरोप देण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मिरवणुकीची विविध गणेश मंडळांसोबत पोलिसांनीही चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील गणेशोत्सव सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आजपर्यंत शहरातील गणेशोत्सवाला कधीही गालबोट लागले नाही. असे असले तरी अतिरेक्यांचा शहराशी संबंध आलेला आहे. शहरात सुमारे १२३६ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक हे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. विविध मंडळे झांज पथक, पावली पथक आणि बॅण्ड बाजा, डी.जे.च्या तालावर नाचत बागडत आपल्या आराध्य देवतेला निरोप देतात.मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी २ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३६ पोलीस निरीक्षक, ९५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी तसेच ११५९ पोलीस कर्मचारी, १६२ महिला पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, ५०० होमगार्ड जवान यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय, विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या मिरवणुकीवर नजर ठेवून असतील. मिरवणूक मार्र्गावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मार्गावरील प्रत्येक व्यक्तीच्या हालचाली टिपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. याशिवाय , सिडको- हडको, नवीन औरंगाबाद शहर गणेशोत्सव मंडळांतर्गत शिवाजीनगर, चिकलठाणा आणि मुकुंदवाडी येथे स्वतंत्र विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्या मिरवणुकीसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असेल.
मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
By admin | Updated: September 8, 2014 00:32 IST