सोयगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दीड वर्षांपासून कात्री लावण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या निधीला ऑगस्ट महिन्यात ढील देण्यात येणार आहे. यामध्ये नरेगामधून आठपैकी चार योजनांचा लाभ लाभार्थींना घेता येणार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शासनाने कात्री लावलेल्या शासकीय योजनांच्या निधीवरील निर्बंध उठविले जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात समृद्धी बजेटमधून ग्रामीण लाभार्थींना समृद्ध करण्यासाठी नरेगाच्या प्रत्येक लाभार्थीला लाभ देण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे.
नरेगाच्या फळबाग/बांधावर किंवा स्वतःच्या खासगी जागेत वृक्षलागवड, सिंचन विहीर, शेततळे, जनावरांसाठी गोठा शेड, शेळीपालन/मेंढीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, नाडेप कंपोस्ट आणि गांडूळ खत यापैकी चार लाभ घेता येणार आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
---
ग्रामसेवक, कृषी सहायकांशी संपर्क साधावा
समृद्धी बजेटचा आराखडा ऑगस्ट महिन्यात तयार करण्यात येणार आहे. आपले नाव आराखड्यात समाविष्ट झाले की नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांनी ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क करावा. जर या आराखड्यात नाव नसेल तर भविष्यात कुठलाही वैयक्तिक लाभ मनरेगातून घेता येणार नाही, असेही तहसीलदार पांडे यांनी सांगितले.