औरंगाबाद : या वर्षापासून ‘पेट’ उत्तीर्णांना नेट- सेटच्या धर्तीवर पात्रता प्रमाणपत्र देण्याची तयारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केली आहे. पंधरा दिवसांत ‘पेट-३’ उत्तीर्णांना हे प्रमाणपत्र दिले जाईल, असे परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले.विद्यापीठाने २८ सप्टेंबर रोजी शहरातील १७ केंद्रांवर ‘पेट’ घेतली. या परीक्षेकरिता ९ हजार २३० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन- तीन दिवसांपूर्वीच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून जवळपास सव्वातीन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र देण्याची संकल्पना कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी मान्य केली असून परीक्षा विभागाने वेगवेगळ्या सुबक प्रमाणपत्रांचे नमुने तयार केले आहेत. सोमवारी ते कुलगुरूंकडे सादर केले जातील. कुलगुरूंनी मान्य केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वाटप केले जातील.यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, सध्या निवडणुकीच्या कामात परीक्षा विभागातील बहुतांश कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे पेट उत्तीर्णांची त्यांना मिळालेल्या गुणांनुसार वर्गीकरणाची प्रक्रिया खोळंबली आहे. खुल्या आणि राखीव उमेदवारांचे वर्गीकरण केल्यानंतर त्याची नोंद पात्रता प्रमाणपत्रावर घेतली जाईल व ते विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल. विद्यापीठात पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जात असून प्रमाणपत्रही दिले जात आहे.
पेट उत्तीर्णांना पात्रता प्रमाणपत्र मिळणार
By admin | Updated: October 12, 2014 00:34 IST