लातूर : ५००, १००० हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय झाल्याने बुधवारी बाजारातील व्यवहार ठप्प झाले. अनेकजण पाचशे-हजारांच्या नोटा घेऊन येत असल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली. भाजीपाल्यापासून सोन्या-चांदीच्या व्यवहारातही पाचशे-हजारांच्या नोटा घेण्यास नकार दिल्याने ही अडचण होती. दवाखाने, मेडिकल दुकान वगळता अन्य ठिकाणी ५००, १००० रुपयांच्या नोटा व्यवहारात चालू शकल्या नाहीत.गांधी मार्केट, गंजगोलाई, बार्शी रोडवरील रयतू बाजार एरवी ग्राहकांनी फुललेला असायचा. मात्र बुधवारी या बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. जे काही ग्राहक आले त्यांनी ५००, १००० रुपयांची नोट व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, विक्रेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे सामान्य विक्रेत्याचा ५०० ते ७०० रुपयांचा होणारा गल्ला १५० ते २०० रुपयांचा झाला. विशेष म्हणजे काही विक्रेत्यांची बोहनीही होऊ शकली नाही. कपडा बाजारातही अशीच परिस्थिती होती. नुकतीच दिवाळी झाली असून, अद्यापही दुकानदारांकडून वेगवेगळ्या आॅफर आहेत. त्यामुळे खरेदीचा कल असला तरी व्यवहारातून या नोटा बंद झाल्याने १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा येथेही जाणवला. एटीएम कार्डवरून व्यवहार करता येतो. परंतु, काल सायंकाळपासून एटीएमही बंद असल्याने या कार्डद्वारे ग्राहकांना मॉल्स अथवा मोठ्या दुकानांतून खरेदी करता येऊ शकली नाही. किराणा दुकान, दूध विक्रेते, जनरल स्टोअर्स, पानटपरी, बेकरी आदी दुकानांतून होणारा व्यवहार चिल्लर नसल्यामुळे ठप्प राहिला. सुटे पैसे नसल्याने सकाळी ब्रेड घेण्यासाठी अनेकांना अडचणी आल्या. (प्रतिनिधी)
व्यवहार ठप्प; १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा
By admin | Updated: November 10, 2016 00:06 IST