लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बांधकाम परवान्याच्या कारणावरून नगर रचना विभागातील ट्रेसरला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी नगर पालिकेत घडली. मारहाण करणारे हे नगरसेविकेचे पती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झाली नव्हती. दरम्यान, तणाव निर्माण झाल्याने पालिकेत पोलीस बंदोबस्त वाढविला होता.आठवड्यापूर्वीच पालिकेतील स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांना बांधकाम सभापती यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. जाधव यांनी ही तक्रार परत घेतली होती. हा प्रकार होऊन दोन दिवस उलटले नाही तोच पुन्हा एकदा पालिकेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.अवैध बांधकाम परवाना आणि नामांतराबद्दल माहिती विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविका पतीला संबंधित कर्मचाऱ्याने व्यवस्थित माहिती दिली नाही. याचवेळी त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वारंवार विनंती करूनही कर्मचाऱ्याकडून उद्धट वागणूक मिळत असल्याने संतापलेल्या नगरसेविका पतीने त्याला धक्काबुक्की केल्याची माहिती पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बीड पालिकेत ट्रेसरला मारहाण !
By admin | Updated: June 10, 2017 00:06 IST