सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुटुंब नियोजनासाठी प्रसुती पश्चात तांबी (पीपीआययूसीडी) बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. या तांबी बसविण्याच्या मोहिमेत बीड जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल ठरले आहे. तर वैयक्तिक तांबी बसविण्यात बीडच्याच दोन आधिपरिचारिकांनी क्रमांक पटकावले आहेत. या सर्वांना राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते नुकतेच मुंबईमध्ये गौरविण्यात आले आहे.नियोजनपूर्वक मूल जन्मास घालण्याचा प्रमाण वाढले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निरोगी आणि पुरेशा अंतराने मूल जन्मास घालण्यासाठी दाम्पत्यांना कुटुंब कल्याण सल्ला आणि साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. प्रौढ जोडप्यामध्ये सुरक्षित शरीर संबंध, पत्नीवर मातृत्व न लादणे व लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंब कल्याणची त्रिसूत्री आहे. तसेच गर्भधारणा होऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय केले जातात. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून यासाठी जनजागृती करण्याबरोबरच मार्गदर्शन केले जाते. यामुळे लोक जागृत होऊन त्यांचा तांबी बसविण्याकडे कल वाढल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. तांबी बसविण्याची मोहीम जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नियोजनपूर्ण राबविल्यामुळे बीड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांचा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्यासह इतर मान्यवरांनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मुंबईत गौरव केला. डॉ. चव्हाण यांच्यासह परिचारिकांचा खा. प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी सत्कार केला.
बीड जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल
By admin | Updated: July 13, 2017 00:45 IST