परतूर : तालूक्यातील शेलगाव येथे एका सार्वजनिक पंक्तीत अचानक जवळपास शंभर जणांना विषबाधा झाली होती. या घटनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुनेच न घेतल्याने विषबाधेचे कारण गुलदस्त्यात राहिले आहे. परतूर तालूक्यातील शेलगाव येथे २५ मार्च रोजी एक धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्त एका सार्वजनिक पंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. या पंक्तीत गावकरी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान जेवले. यावेळी वरण, भात , पोळी, एक भाजी, शिरा आदी पदार्थांचा समावेश होता. जेवणानंतर सायंकाळी अचानक काही गावकऱ्यांना उलटी, मळमळ असा त्रास सुरू झाला. अशा रुग्णांची संख्या जवळपास शंभरवर पोहोचली. या रुग्णांना सातोना खु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी माजी सरपंच विलास आकात, परमेश्वर आकात, रऊफ खा पठाण नवल यांच्यासह गावकऱ्यांनी प्रयत्न केले. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेलू येथे दाखल करण्यात आले. तर ज्या रुग्णांची प्रकृती स्थिर होती अशा रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. आता या सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे ग्रामीण तालुका आरोग्य अधिकारी जे. के गोळेगावकर यांनी सांगितले. मात्र, या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथील अन्नाचे नमुने घेण्यात हलगर्जीपणा केल्याने या विषबाधेचे कारण अखेर गुलदस्त्यातच राहिल, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)