औरंगाबाद : शहागंज चमनमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याशेजारचे सुलभ शौचालय हटवून चमनचे सुशोभीकरण केले जाणार आहे.हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंदाताई जरीवाला यांनी हे शौचालय न हटविल्यास मी स्वत: कुदळीने ते पाडीन, असा इशारा दिल्यानंतर बुधवारी सकाळी उपमहापौर संजय जोशी व सभापती विजय वाघचौरे यांनी चमनची पाहणी केली. शौचालयाच्या जागेवर हजेरी सेंटर किंवा पोलीस चौकी सुरू करावी, पाणपोई व पत्र्याची खोली पाडून टाकावी, परिसर स्वच्छ करावा, अनधिकृत शौचालय बंद करावे, असे आदेश उभयतांनी अभियंत्यांना दिले. यासंदर्भात मनपाच्या येत्या सभेत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. चमनच्या दक्षिणेकडे सुलभ शौचालयासाठी महापालिकेने पिलर उभे केले आहेत. हा सरदार पटेल यांचा अवमान असून आम्ही जिवंत असेपर्यंत तेथे शौचालय होऊ देणार नाही, असा इशारा जरीवाला यांनी दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २३ जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय जोशी व विजय वाघचौरे सकाळी १० वा. पटेल यांचा पुतळा व चमनची पाहणी करण्यासाठी आले होते. पुतळ्याची मागील बाजू सध्या शौचालय म्हणून वापरली जात आहे. शहागंजमधील फळविक्रेते सडलेली फळे चमनमध्ये फेकून देतात. फळे सडून दुर्गंधी येत असल्याचे जोशी व वाघचौरे यांच्या या भेटीत निदर्शनास आले. चमन परिसरात लघवी करण्यास बंदी घालावी, असे आदेश त्यांनी वॉर्ड अभियंता बी. डी. फड, वॉर्ड अधिकारी एस. आर. दरारे, शाखा अभियंता सुनील जोशी यांना दिले. चमन परिसरात सडलेली फळे टाकणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. पुतळ्यासमोरील पाणपोई व पत्र्याची खोली काढून टाकण्यात येणार आहे. सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर झाल्याचे बी. डी. फड यांनी सांगितले. चमन परिसराला चारही बाजूने संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे. तो बसविण्यासंदर्भात येत्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात येईल, असे आश्वासन संजय जोशी यांनी दिले. उपमहापौरांनी घेतली चंदातार्इंची भेटउपमहापौर संजय जोशी व सभापती विजय वाघचौरे यांनी शहागंजमधील सरदार वल्लभभाई पटेल पुतळा परिसराची पाहणी करून नंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंदाताई जरीवाला यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सुलभ शौचालयाच्या जागेवर मनपा सफाई कामगारांचे हजेरी सेंटर किंवा किराणा चावडी पोलीस चौकी सुरू करणार. एस. टी. महामंडळाच्या शहागंजमधील जागेवर सुलभ शौचालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आठ दिवस वाट पाहू. तोपर्यंत कामाची प्रगती दिसली नाही तर मग पुढे आंदोलनाचा निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी जरीवाला यांनी दिला. ती मुतारीही हटविणारसरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस किरकोळ विक्रेत्यांनी मुतारी करून टाकली. चमन परिसरात लघवीस बंदी घाला, तसे फलक लावा, असे आदेश उपमहापौर संजय जोशी यांनी वॉर्ड अधिकारी व अभियंत्यांना देत असताना तेथे काही विक्रेते लघवीसाठी आले. संतापलेल्या उपमहापौरांनी व सभापतींनी त्या लोकांना तेथून हकलून दिले.
चमनचे सुशोभीकरण लवकरच
By admin | Updated: July 24, 2014 00:39 IST