लोहा : लोहा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या क्षुल्लक शाब्दिक चकमकीनंतर सर्वसाधारण सभा आटोपून जात असताना मुख्याधिकाऱ्यांना नगरसेविका पुत्राने चारचाकी वाहनाने मोटारसायकलचा सिनेस्टाईल पाठलाग करत बेदम मारहाण केल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिवाजी चौकालगत मुख्य रस्त्यावर घडली़गुरुवारी लोहा नगर परिषद कार्यालयात विशेष सभा सकाळी ११ वाजता होती़ रितसर सभा सुरू झाल्यानंतर नगरसेविका जिजाबाई वाघमारे यांचे सुपूत्र युवराज वाघमारे हे सभागृहात बोलत असताना तुमची आई नगरसेविका आहे, त्यांना बोलू द्या़ सभागृह संपल्यानंतर आपण बोलू असे म्हटल्यानंतर दोघांत शाब्दिक चकमक उडाली़ त्यानंतर मुख्याधिकारी आऱ सी़ सरवदे निवडणूक कामासाठी ऩ प़ चे कर्मचारी बालाजी फरकंडे यांच्या दुचाकीवर तहसील कार्यालयाकडे निघाले असता शिवाजी चौकालगत मुख्य रस्त्यावर कारने नगरसेविका पूत्र युवराज वाघमारे, बालासाहेब वाघमारे, विशाल घंटे व बालाजी तरटे यांनी सिनेस्टाईल मोटारसायकलचा पाठलाग करून कार आडवी लावली व कारमधून उतरून मुख्याधिकारी सरवदे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले़ मारहाणीच्या भीतीने सरवदे पळत असताना आरोपींनी पुन्हा पाठलाग करून मारहाण केली़ मारहाण होत असताना उपस्थितांनी मध्यस्थी करून मिटविले़ भेदरलेल्या व अंगावरील फाटलेल्या कपड्यावरच मुख्याधिकारी सरवदे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली़(वार्ताहर)लोहा पोलीस ठाण्याची आज तपासणी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया हे सकाळापासूनच तळ ठोकून असताना देखील एक जबाबदार अधिकाऱ्याला भर रस्त्यावर फिल्मीस्टाईल मारहाण होते, तिथे सर्वसामान्यांचे काय असा सवाल जनतेतून होत आहे़ घटनेची माहिती कंधार उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर यांना समजताच त्यांनी लोहा पोलीस ठाण्यात घटनेचा आढावा घेतला़ दलित चळवळीतील बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष व्ही़ के़ कांबळे यांनी घटनेसंदर्भात विरकर यांच्याशी चर्चा करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली़
मुख्याधिकाऱ्यांना मारहाण
By admin | Updated: August 29, 2014 01:27 IST