औरंगाबाद : अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात सहआरोपी करून अटक करण्याची धमकी देत महिलेकडून पाच हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली.रावसाहेब रायभान बोराडे (रा. अविनाश कॉलनी, सातारा परिसर) असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बोराडे करमाड पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या पतीला दारुचे व्यसन आहे. १९ आॅगस्ट रोजी त्याने देशीच्या पाच बाटल्या विकत घेतल्या. त्यातील एक बाटली पिली. उर्वरित चार बाटल्या घेऊन घरी येत असताना हवालदार बोराडेने त्याला पकडले. अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर बोराडेने या व्यक्तीच्या पत्नीस ‘तुलाही या गुन्ह्यात सहआरोपी करून अटक करतो’ अशी धमकी दिली. अटक टाळायची असेल तर आठ हजार रुपये दे, असे तो म्हणाला. महिलेने त्याला होकार दिला; परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत कार्यालय गाठून तक्रार दिली.त्यावरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी ती महिला करमाड पोलीस ठाण्यात गेली. तेथे हवालदार बोराडे बसलेला होता. त्याने आठ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजारांवर तो तयार झाला. लाचेचे पैसे त्याने स्वीकारताच बाजूला दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या पोलिसांनी झडप मारून त्याला रंगेहाथ अटक केली. हवालदार बोराडेविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाच हजार रुपयांची लाच घेताना हवालदार पकडला
By admin | Updated: August 28, 2014 00:22 IST