अर्धापूर : तालुक्यात केळी व्यापाऱ्यांनी ३० रुपयांवरून ६० रुपये प्रतिक्विंटल खर्च शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणार असल्याचे स्वयंघोषित केले़ यावर शेतकऱ्यांकडून ओरड होत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती गप्प का? अशी केळी उत्पादकांत चर्चा चालू आहे़गतवर्षी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेवरून आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांनी केळी व्यापारी व केळी उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली होती़ त्या बैठकीत २० रुपये प्रतिक्विंटल खर्च शेतकऱ्यांकडून आकारण्यात येईल, असे ठरले असताना केळी व्यापाऱ्यांनी ३० रुपये प्रतिक्विंटल खर्च आकारला़ पण यावर्षी केळी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रतिनिधी किंवा केळी उत्पादक शेतकरी यापैकी कोणालाही बैठकीला न बोलावता ३० रुपयांवरून ६० रुपये प्रतिक्विंटल खर्च आकारण्यात येईल, असे घोषित केले़ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वपक्षीय सहा संचालक कार्यरत आहेत़ पण दुपटीने केळी खर्चात केळी व्यापाऱ्यांनी केलेल्या दरवाढीवर एकाही संचालकाने ‘ब्र’ काढला नाही़ तसेच या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर २ कोटी ८९ लाख रुपये खर्चून कृषी पणन मंडळातर्फे सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहे़ या सुविधा केंद्राची २५ मे़ टन आणि शीतगृहाची ५ मे़ टन क्षमता आहे़ पण या सुविधा केंद्राचा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी कृषी पणन मंडळाकडून काहीच हालचाली नाहीत़ शीतगृह तयार असूनही त्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे़ (वार्ताहर)कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केवळ बैठकीचा भत्ता उचलण्यापुरतेच आहेत का? -प्रल्हाद इंगोले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नांदेडकेळी व्यापाऱ्यांनी घोषित केलेली प्रतिक्विंटल खर्चवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही - चुडाजी शिरगुळे, केळी उत्पादक शेतकरी़
केळी व्यापाऱ्यांवर मनमानीचा आरोप
By admin | Updated: June 12, 2014 00:20 IST