छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. प्रवेशासाठी घेतलेल्या ‘पेट’ची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी रात्री जाहीर केली आहे. मे महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रोव्हिजनल लेटर देण्यात येतील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली.
विद्यापीठाने पेट- ६ परीक्षा मागील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घेतली होती. ९ हजार १६६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. संशोधन अधिमान्यता समितीसमोर ४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान विषयाचे सादरीकरण पार पडले. ८० टक्के आणि २० टक्के अशा पद्धतीने गुणांकनानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. त्यासोबत विद्यापीठाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या विषयामधील विद्यापीठ मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांचा शोध घ्यावा आणि त्यांची लेखी संमती घ्यावी.
तसेच मार्गदर्शक ज्या संशोधन केंद्राशी संलग्न आहेत. त्या केंद्रात मार्गदर्शकाची संमती व सुधारित संशोधन संकल्पना २६ मे २०२५ पूर्वी सादर करावी, असे म्हटले आहे. या यादीत सूट मिळालेले १ हजार ८२४ विद्यार्थी होते. विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतील १८ विषयातील ६८३, मानव्य विद्या शाखेत १३ विषयातील १७३ आंतर विद्या शाखेत ६ विषयात २४० वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेतील ३ विषयांसाठीच्या २६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.