हिंगोली: जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत लहान मुलांना मुख्याध्यापकांकडून मार्गदर्शन करून पालक व घरातील मंडळींना मतदानाची आठवण करून देण्याचे काम केले जाणार आहे. बालहट्टामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी व्यक्त केली.घरातील मुलांचा शब्द सहसा कोणी टाळत नाही. शिवाय लोकशाही बळकटीसाठी सर्वात मोठा हक्क असलेला मतदानाचा हक्क व राष्ट्रीय कर्तव्य बजावणे किती गरजेचे आहे, हे लहान मुलांनी पटवून दिले तर मोठ्यांवर त्याचा निश्चितच परिणाम होईल. प्रत्येक घरात बालक असतोच. त्यामुळे त्यांनी मतदानाच्या दिवशी आपल्या घरातील सर्व सदस्यांना मतदानासाठी आठवण करून द्यावी. त्यासाठी त्यांना काही घोषवाक्यासारखी जी सहज तोंडी येतील अशी वाक्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. २ आॅक्टोबरला ग्रामसभा होणार आहेत. त्यात शंभर टक्के मतदानासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी प्रभातफेरीही काढली जाईल. मतदान करूनच लोकांनी कामावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदानवाढीसाठी बालहट्टाची मात्रा
By admin | Updated: September 27, 2014 00:54 IST