लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघणार आहे. दयानंद महाविद्यालयासमोर या मोर्चाचा समारोप होणार असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. दयानंद महाविद्यालयाच्या गेटसमोर बहुजन क्रांती मोर्चाची सांगता होणार असून, तेथे वामन मेश्राम यांचे मार्गदर्शन होणार आहे. अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, अॅट्रॉसिटीसाठी स्वतंत्र न्यायालय, यंत्रणा निर्माण करण्यात यावी, जे लोक एससी, एसटीमधील लोकांचा गैरवापर करून अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करीत आहेत, अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, भटके विमुक्त जाती-जमातीसाठी स्वतंत्र केंद्रीय अनुसूची करण्यात यावी, त्यांनाही अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडक करण्यात यावा आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा निघणार आहे, असेही संयोजन समितीने पत्रपरिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
लातुरात आज बहुजन क्रांती मोर्चा
By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST