हिंगोली : मानव विकास मिशन आणि जिल्हा आरोग्य विभागाचा समन्वय नसल्याने शिबिराचा ताळमेळ लागलेला नाही. परिणामी, गतवर्षीच्या शिबिरांची २३ लाखांची रक्कम बुडीत मजुरीसाठी वापरण्यात आली. यंदाही तीच बोंब असल्याने मागील ६ महिन्यांतील १४४ शिबिरांचा निधी इतरत्र वळवण्याची दाट शक्यता वाटते. अन्यथा २५ लाख ९२ हजारांचा निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीच्या अपूर्ण शिबिरामुळे २३ लाखांची रक्कम उरली होती. आरोग्य विभागाला ही रक्कम यंदाच्या शिबिरासाठी वापरण्याचे शहाणपण सुचलेले नाही. उलट हा निधी अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांच्या बुडीत मजुरीसाठी वापरला गेला. त्यामुळे प्रसूतीपूर्व आणि नंतर मिळणारी २००० हजारांची रक्कम मिळाली. अगदी शिबिरांसारखीच अवस्था या मजुरीची गतवर्षी झाली होती. गत अनुभव पाहता दोन्ही विभागाने यंदाही नियोजन केले नाही. पहिले पाढे पंचावन्न असल्याने बघता, बघता अर्धे वर्ष लोटले. शिबिरे झाले नसल्याने २५ लाख ९२ हजारांचा निधी वापरण्यात आलेला नाही. लाखांच्या घरात असलेली ही रक्कम वापराविना पडून राहिली. सर्वसामान्य कुटुुंबातील गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी या रक्कमेतून योजना राबवायच्या होत्या. परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना बसला. एकीकडे मानव विकास मिशन आरोग्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी देत असताना केवळ नियोजनाअभावी ही रक्कम परत जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. आरोग्य केंद्र व मिळणारा निधीहिंगोली, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यात प्रत्येकी ४ प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. हिंगोलीत फाळेगाव, नर्सी नामदेव, सिरसम, भांडेगाव तर औंढा तालुक्यात पिंपळदरी, लोहरा, जवळा बाजार, शिरडशहापूर आणि सेनगाव तालुक्यात गोरेगाव, कापडसिंगी, साखरा, कौठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. (प्रतिनिधी)
शिबिरांचा निधी परत ?
By admin | Updated: October 1, 2014 00:27 IST