वसमत : येथे प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने काव्य- मैफील घेण्यात आली. काव्य मैफिलीची सुरूवात विष्णू थोरे यांच्या कवितेने झाली. स्त्रीभूुण हत्या, हुंडाबळीच्या काळात लेकीचे महत्व थोरे यांनी आपल्या कवितेतून स्पष्ट केले. ‘ जरी संसार इस्तव लेक सरपण नाहीलेकी वाचून घराले बाप्पा घरपण नाही’कवी तुकाराम धांडे यांनी आपल्या रान कवितांच्या माध्यमातून निसर्गाचे चित्र रसिकांसमोर उभे करत अनेक सामाजिक, कौटुंबिक व पर्यावरणाच्या प्रश्नांना हात घालत रसिकांशी थेट संवाद साधला. ‘वाटणी’ या कवितेतून त्यांनी वाटणी सारख्या कटू प्रसंगातील दोन भावांचा परस्पर जिव्हाळा व प्रेम व्यक्त केले. ‘आपण दोघं जिवंत असेपर्यंततू मला आणि मी तुलातुझ्या दुखण्याखुपण्यात माझी मांडी तुलामी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला’यासोबतच तुकाराम धांडे यांनी तिसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली ‘रानवेडी’ ही कविता सादर केली. ‘तुकोबा आणि आजोबा’ या कवितेलाही रसिकांनी चांगलीच दाद दिली. तर ‘भूगोल’ या कवितेतून विकास प्रक्रियेचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी ‘हा भुगोल वाचवायलाच पाहिजे’ हा दिलेला संदेश रसिकांना अंतर्मुख करावयाला लावणारा होता. परभणी येथील कवी संतोष नारायणकर यांनी आपल्या कवितेतून एकत्र कुटुंब पद्धतीतील नातेसंबंधावर भाष्य केले. ‘तडतडणारे ऊन साहतो मराठवाडातरीही आनंदाची गाणी गातो मराठवाडा’या ओळीतून मराठवाड्याची रसिकता त्यांनी व्यक्त केली. तर ‘ देवा दूध सांडले की धुके बाई गंढग घेती डोंगराला झोके बाई गं’ अशा काव्यपंक्तींचा आधार घेत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात झालेल्या मैफिलीस तुकाराम धांडे (इगतपुरी), विष्णू थोरे (चांदवड, नाशिक), नारायण पुरी (औरंगाबाद), संतोष नारायणकर (परभणी) व केशव खटींग यांचा सहभाग होता. प्रास्ताविक यल्लाप्पा मीटकर यांनी केले. सूत्रसंचालक प्रा. महेश अचिंतलवार यांनी रंगत वाढवली. यावेळी गटशिणाधिकारी विठ्ठल भुसारे, अॅड. राजा कदम, प्रकाश इंगळे यांनी पुढील वर्षी प्राचार्य पतंगे यांच्या नावाने राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्याचा व रावसाहेब पतंगे स्मृती गौरवग्रंथाचे संपादन करण्याचा संकल्प जाहीर केला. उपप्राचार्य बी.डी. कदम यांनी अध्यक्षीय समारोपात पुढील वर्षी एक वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठाणचे प्रकाश इंगळे, प्रवीण शेळके, गजानन पाठक केशव खटींग, मनोज चव्हाण, सीताराम म्यानेवार, शिवकुमार पांचाळ, शेख इम्रान, अनिल जाधव, प्रवीण नादरे, मुंजाळ आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
‘लेकीवाचून घराले बाप्पा घरपण नाही’
By admin | Updated: September 14, 2014 23:36 IST