अंबड/वडीगोद्री : कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे गेलेल्या आॅटोरिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. यात रिक्षातील दोघे जण ठार झाले. तर एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. कंटेनर व ट्रकचालकांविरूद्ध गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १४ जून रोजी दुपारी ३ वाजता घडली. बीड-औरंगाबाद मार्गावरील महामार्ग पोलिस दलाच्या चौकीसमोर भरधाव वेगातील ट्रकवर (एम.एच.२० बी.टी. ६५) अॅपेरिक्षा (एम.एच.२१/एम. ३४२९) आदळली. ेरिक्षाचालकाने कंटेनरला (एम.पी.०४ वाय. १९९९) ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात ही धडक झाली. यात ट्रकच्या चाकाखाली येऊन कडूबाई लक्ष्मण देहेडे (६५) ही महिला जागीच ठार झाली. तर रामभाऊ खंडूजी लबडे (६०) हे प्रवासी अंबडच्या सरकारी दवाखान्यात मरण पावले. वडीगोद्रीहून शहागडकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अॅपेरिक्षाचालकाने समोरच्या कंटेनरला ओव्हरटेक करीत वेगात पुढे गेला. मात्र समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. यात सुरमापुरी (ता.अंबड) येथील कडूबाई लक्ष्मण देहेडे (६५) ही महिला अॅपेरिक्षातून खाली कोसळली. त्या थेट ट्रकच्या चाकाखाली गेल्या. त्यामुळे त्यांचा पार चेंदामेंदा झाला. अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात उपचार सुरू असतांना लोणारभायगाव (ता. अंबड) येथील रामभाऊ खंडूजी लबडे (६०) हे मरण पावले. अन्य तिघे प्रवासी सुंदर राधाकिसन बीडकर (३६), शकुंतला सुंदर बीडकर (३०) व अनिल सुंदर बीडकर (१०) हे एकाच कुटूंबातील तिघेही जखमी झाले. सर्व जखमींना सुरूवातीला शहागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सेवा उपलब्ध झाली नसल्याने सर्वांना अंबडला हलविण्यात आले. त्याठिकाणीही जखमींना उपचारासाठी बराचवेळ प्रतीक्षा करावी लागली. हा अपघात घडल्यानंतर सहायक उपनिरीक्षक पी.टी. भोसले, देविदास भोजने, विष्णू चव्हाण यांनी धाव घेतली. दुसऱ्या वाहनातून जखमींना तात्काळ दवाखान्यात हलविले. (वार्ताहर)
आॅटोला कंटेनरची धडक; दोन ठार
By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST