औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये औरंगाबादने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरांना औरंगाबादने मागे टाकले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामामुळे हे स्थान मिळविता आले आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सर्व स्मार्ट सिटी शहरांच्या रँकींगमध्ये औरंगाबादला तिसरे स्थान मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. रँकींग टेबलमध्ये औरंगाबादने नागपूर, नाशिक, सोलापूर, कल्याण- डोंबिवली आणि ठाणे मनपाला मागे टाकले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रँकींग देण्यात आली. विशेष म्हणजे, महानगरपालिका प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कामावर बारकाईने लक्ष दिले. देशभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गाच्या काळामध्ये प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रयत्न केले. तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याने ही सुधारणा औरंगाबादला चालना देणारी ठरणार आहे.
-----
महत्त्वाच्या प्रकल्पांमुळेच ही झेप
मास्टर सिस्टिम इंटिग्रेटर आणि ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन यांची प्रकल्पांमुळे वेगवान प्रगती झाली आहे. कॅलेंडर वर्षाच्या समाप्तीपूर्वीच शहरात प्रगती दिसून येईल. सफारी पार्क, ई-गव्हर्नन्स आदी कामे टेंडर टप्प्यात आहेत. सायकल ट्रॅक यासारखे महत्त्वाचे प्रकल्प असल्याचे एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले. तर सध्या सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेनंतर या प्रकल्पांचा वेग वाढेल आणि रँकींग आणखी वाढविण्यास मदत होईल, अशी आशा एएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी व्यक्त केली.