औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.२) जाहीर केला असून, औरंगाबाद विभागाचा निकाल ९०.९८ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९४.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.४४ टक्के, कला शाखेचा ८८.०६ टक्के आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल ८८.४९ टक्के लागल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विभागात बीड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून ९२.३६ टक्के निकालापर्यंत मजल मारली आहे. निकालाच्या टक्केवारीने नव्वदी पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही सुखदेव डेरे यांनी स्पष्ट केले. १२ वीचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दि. १० जून रोजी दुपारी ३ वाजेनंतर त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून वितरित केल्या जातील. परीक्षा प्रक्रियेला कोणतेही गालबोट न लागता वेळेच्या आत आणि दणदणीत निकाल लागल्याबद्दल मंडळ अध्यक्षांनी सर्वांना मिठाई भरवून, मंडळाचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले. ते म्हणाले, विभागातून १ लाख ११ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख १ हजार ३४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. उत्तीर्ण श्रेणीत येणार्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १ हजार ३८७ एवढी नाममात्र आहे. उत्तीर्णमध्ये यावेळीही मुलींचा टक्का अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.४७ टक्के असून, मुलींचे प्रमाण ९३.६१ टक्के एवढे मोठे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.१ टक्क्याने अधिक आहे. विभागात बीड जिल्हा प्रथम (९२.३६ टक्के), औरंगाबाद जिल्हा द्वितीय (९१.२४ टक्के), हिंगोली जिल्हा तृतीय (९०.७१ टक्के), जालना जिल्हा चतुर्थ (८९.८७ टक्के) व परभणी जिल्हा पाचव्या (८९.१२) क्रमांकावर आहे. गैरमार्गाशी लढा अन् यश परीक्षेतील कॉप्यांना प्रतिबंध करण्यासाठी मंडळामार्फत सतत चौथ्या वर्षी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात आले. शासन व राज्य मंडळाने आखून दिलेल्या आराखड्यानुसार विभागातील परीक्षा केंद्रावर गैरमार्गाशी लढा कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्याचे दृश्य परिणामही दिसले. परीक्षेत एकही तोतया विद्यार्थी आढळला नाही. कॉपीची ६२ प्रकरणे नोंदविली गेली; परंतु एकाही प्रकरणात शिक्षकाचे साह्य समोर आले नाही. गैरप्रकाराचे हे प्रमाण ०.०५ टक्के एवढे अत्यल्प आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे पहिल्या वर्षी घसरलेली निकालाची टक्केवारी वाढली. निकालही उंचावला आहे. गुणवंतांना आवाहन यशाचे शिखर गाठलेल्या बारावी परीक्षेतील सर्व गुणवंताचे हार्दिक अभिनंदन. यशाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुणवंतांना लोकमतमधून प्रसिद्धी दिली जाईल. ९५ टक्के व त्याहून अधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांनी आपले रंगीत छायाचित्र, गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह आज मंगळवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत लोकमत भवन येथे आणून द्यावीत.
औरंगाबाद विभागाचा निकाल ९०.९८ टक्के
By admin | Updated: June 3, 2014 01:11 IST