औरंगाबाद: रिक्षाचालक छेडछाड करत असल्यानं तरुणीनं धावत्या रिक्षातून उडी मारली आहे. तरुणीच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या आहेत. तरुणी ट्युशनला जात असताना हा प्रकार घडला. सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान ही घटना घडली. रिक्षाचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आज सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास जालना रोडवर मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी रिक्षामध्ये बसली. ती एकटीच रिक्षात होती. तरुणीला त्या रिक्षाचालकाविषयी संशय आला. तिने त्या रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितलं. परंतु तो रिक्षा अजूनच वेगाने घेऊन जाऊ लागला. शेवटी घाबरून त्या तरुणीने धावत्या वेगवान रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली. परंतु रिक्षातून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
रिक्षातून बाहेर उडी घेतलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली. ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली असताना अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे निलेश सेवेकर यांनी तिला पाहिलं. त्यांनी तातडीनं मुलीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात धीर दिला. तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांशी संपर्क साधला. मुलीच्या पालकांना तातडीने तिथे बोलावून घेतले. रिक्षाचालकाला तिथे जमा झालेली गर्दी दिसली व त्यामधून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो रिक्षा चालक लगेचच तिथून पळून गेला.
काही वेळाने जखमी मुलीचे मामा व भाऊ घटनास्थळी पोहचले. त्यांनी मुलीस तातडीने जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. तिच्यावर उपचार करून नातेवाईकांनी घरी नेले. परंतु, ती मुलगी खूप घाबरलेली होती. तो नराधम रिक्षा चालकाला धडा शिकवण्याच्या आत तो पळून गेला. मुलीचे धाडस व हेल्प रायडर्स निलेश याच्या तप्तरतेमुळे पुढील अनर्थ टळला.