औरंगाबाद : मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच पाणीपुरवठा योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आॅडिट करण्यात येणार आहे. १०,६८५ पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट केले जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली. त्या योजनांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात येणार आहे.मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक गावांत २ ते ३ योजना राबविण्यात येऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्या योजना डबघाईस आल्या आहेत. अनेक ठिकाणी वितरण व्यवस्था खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा करता येत नाही. काही पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचा गावनिहाय आढावा घेतला जात आहे. दरडोई ४० लिटर पाणी देणाऱ्या योजनेत लोकसंख्या वाढल्यामुळे वाढ करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये जि. प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचा समावेश आहे. पाणी योजनांचे आॅडिट करताना वितरण व्यवस्था, योजनांची दुरुस्ती, स्रोत बळकटीकरण, वीज बिल आदींची तपासणी होईल.
पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट
By admin | Updated: May 12, 2016 00:56 IST