पैठण : महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा शनिवारी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडलेल्या विकास कामांना व बांधकामास चालना मिळणार आहे. वाळूपट्ट्यांचा लिलाव न झाल्यामुळे विविध शासकीय कामांसह बांधकामे बंद पडलेली होती. सध्या वाळूची मागणी लक्षात घेता महसूल प्रशासनास लिलावातून चांगला महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.पैठण तहसीलने वेळोवेळी वाळू तस्करांवर केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली वाळू तालुकाभर गोदावरीच्या काठावर व पोलिसांनी जप्त केलेली वाळू पोलीस ठाण्याच्या आवारात होती. अशा प्रकारे एकूण १०६० ब्रास वाळूचा लिलाव सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात होणार आहे. वाळूचा प्रतिब्रास हा २२३६ रुपये असा काढण्यात आला असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले. यामध्ये पाटेगाव-१० ब्रास, दादेगाव जहागीर- ५३ ब्रास, वडवाळी-४२ ब्रास, नायगाव- ०७ ब्रास, टाकळी अंबड- ५० ब्रास, हरिडपुरी- ६० ब्रास, हिरडपुरी- ६० ब्रास व पैठण पोलीस स्टेशनमधील ४१३ ब्रास वाळूचा लिलाव करण्यात येणार आहे. वाळूसाठ्यांचा लिलाव तस्करांसाठी आजपर्यंत मोठी पर्वणीच ठरत आला आहे. त्यातच प्रशासनाने साठ्यावरील वाळू उचलण्यास सरसकट १५ दिवसांची मुदत दिल्याने याचा फायदा तस्करांना मिळणार आहे. तस्कर छोटा साठा बोली बोलून घेतात व हा साठा उचलून परत गोदावरीतून वाळू उपसा करून ‘जैसे थे’ ठेवतात. वाळूसाठ्यासाठी मिळालेली रॉयल्टी पकडली गाडी तर दाखवायची, नाही तर एकाच पावतीवर दिवसभर वाहतूक सुरू हे धोरण राबवून लिलावाच्या नावावर प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. यामुळे लिलावात मोठे वाळूपट्टे घेणारेसुद्धा भाग घेण्याची शक्यता आहे.
जप्त वाळूसाठ्यांचा आज लिलाव
By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST