महेश पाळणे ,लातूरजिल्हा क्रीडा संकुलातील विविध खेळांच्या मैदानाची दुरवस्था झाली आहे़ यासह खेळाडूंच्या मूलभूत गरजांकडे क्रीडा खात्याचे दुर्लक्ष असल्या बाबतची वृत्त मालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे़ सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा केली़ गेल्या अनेक दिवसांपासून क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह विविध खेळांची मैदाने नादुरुस्त होती़ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या दुरुस्तीसाठी निधीही वर्ग केला होता़ मात्र या मैदानाची दुरुस्ती अर्धवटच झाली होती़ खेळाडुंनीही जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना वेळोवेळी मैदान दुरुस्ती बाबत विनंती केली होती़ मात्र सरकारी काम अन् सहा महिने थांब, यापेक्षाही बत्तर अवस्था या कामाची झाली होती़ त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षकातून नाराजी व्यक्त होती़ हा धागा धरतच लोकमतने १३ मार्च पासून ‘दुर्दशा क्रीडांगणाची’ वृत्त मालिका प्रकाशित केली़ सोमवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी आऱडी़माहादावाड यांच्याशी क्रीडा संकुलाच्या मेन्टन्स व मैदान दुरुस्तीबाबत चर्चा केली़ यामुळे मैदान दुरुस्ती कामाला लवकरच मुहुर्त लागणार असल्याचे कळते़ याविषयी जिल्हा क्रीडा अधिकारी आऱडी़ माहादावाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीवर सोमवारी चर्चा झाली़ मंगळवारी काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही़ मात्र बुधवारी त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्यात येणार आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा होणार असून, मैदान दुरुस्तीसह क्रीडा संकुलातील अन्य गरजांची बुधवारी पहाणी करुन याची दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे म्हणाले़
क्रीडा संकुलाच्या गैरसोयीवर लक्ष
By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST