खानापूर ता़ देगलूर येथील शकुंतला चंद्रकांत वाघमारे या वृद्ध महिलेची २० गुंठे जमीन मौजे खानापूर ता़देगलूर येथे आहे़ आरोपी शिवराज बाळासाहेब शिंदे (रा़ हाळदा, ता़ कंधार) यांनी व त्यांचे साथीदार सुनील मारोतीराव कदम (रा़ बामणी), दिलीप चंद्रभान सरजे (रा़ किवळा), मारोती मल्लू यन्नलवार (रा़ खानापूर) यांनी ५०० रुपयांचा मुद्रांक शपथपत्रासाठी विकत घेवून त्यावर बनावट सौदाचिठ्ठी- करारनामा नमूद केला़ या करारनाम्यावर शकुंतला वाघमारे यांच्या ऐवजी इतर कोणासतरी नोटरीसमक्ष उभे करून सही व अंगठा घेतला़ याशिवाय वाघमारे यांच्या निवडणूक ओळखपत्रावरील नक्कल करून मिळविलेला फोटोवरील फोटो तयार करून बनावट सौदाचिठ्ठी तयार केली़ याशिवाय वाघमारे यांना एक रुपयाही न देता २० लाख रुपये दिल्याचे करारनाम्यात नमूद केले़ आरोपींचा जमीन हडपण्याचा प्रयत्न असल्याचे उघडकीस येताच शकुंतला वाघमारे यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यावरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे़ तपास पोलिस उपनिरीक्षक लष्करे करीत आहेत़ (वार्ताहर)
बनावट सौदाचिठ्ठी करून वृद्ध महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न
By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST