हिंगोली : प्रत्येक शिधापत्रिकाधारकास आता आधार व बँक खाते संलग्निकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी गावनिहाय कॅम्प घेतले जाणार असून बीपीएल लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी शंभर रुपये रोजगार भत्ता म्हणून दिला जाणार आहे.राज्य शासनाने याबाबत तयारी चालविली असून सर्वच जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांची त्यासाठी नुकतीच बैठक झाली. संलग्निकरणाचे हे काम १५ मार्चपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी गावनिहाय कॅम्प आयोजित करण्यास सांगण्यात आले. या कॅम्पला तलाठी, ग्रामसेवक, आधार मशीन उपलब्ध राहणार आहे. तेथेच बँक खाते उघडण्यासाठीची सर्व कागदपत्रे पूर्ण केली जाणार आहेत. ज्यांचे आधार कार्ड व बँक खतो आहे, त्यांचे अर्ज तत्काळ भरून घेतले जातील. ज्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, त्यांची या दोन्हींची प्रक्रिया केली जाईल.या संलग्निकरणासाठी सर्व सभासदांचे छायाचित्र, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक लागणार आहे. त्याचबरोबर सर्वांचे अर्जही भरून घेतले जाणार असून ते या केंद्रावर जमा केले जाणार आहेत. त्यांची नोंदणी करुन ते संगणकीकरणासाठी पाठविले जाणार आहेत. त्यानंतर महसूलच्या यंत्रणेकडून त्याची तपासणी अथवा पडताळणीही केली जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांची माहिती महसूल विभागाकडून अद्ययावत केली जाणार आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत कॅम्पद्वारे जमा झालेल्या माहितीचे संगणकीकरण केले जाणार आहे. १५ मार्चपर्यंत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कुटुंबातील सदस्यसंख्येप्रमाणे प्रत्येकी शंभर रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर व एकदाच दिले जाणार आहे.
शिधापत्रिकांचेही आधार संलग्निकरण
By admin | Updated: January 14, 2015 00:54 IST