जालना : शहरातील नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मालमत्तांचे जीआयएस मॅपिंक म्हणजे भौगोलिक प्रणालीद्वारे सर्वेक्षण होणार आहे. यामुळे अतिक्रमणासोबतच अवैध बांधकामाचीही माहिती मिळणार आहे. नगरविकास विभागाने नुकताच अध्यादेश काढला असून, सर्व नगर पालिकांनी हे सर्वेक्षण करणे बंधनकारक केले आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्ताधारकाची पूर्ण भौगोलिक माहिती संकलित होणार आहे. सर्वे केलेल्या तारखे नंतर काही वर्षांनी संबंधित मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेत काही बदल केले का, काही अवैध बांधकाम केले का, अतिक्रमण केले का याची माहिती या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे. सदर सर्वेक्षण करण्यासाठी नगर पालिकेस निविदा प्रक्रिया राबवावी लागणार असून, संबंधित एजन्सी हा सर्वे करणार आहे. शासनाकडूनही या सर्वेक्षणाबाबत वेळावेळी सूचना करण्यात येणार आहे. जालना शहरातही अनेक ठिकाणी बांधकामांत घोळ आहे. काही रहिवशांमध्येही जागेवरुन वाद आहेत.यामुळे नगर पालिकेलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्वेमुळे मालमत्तांची अचूक माहिती संकलित होणार आहे. मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले की, सदर जीआरचा अभ्यास करुन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
शहरातील मालमत्तांचे होणार सर्वेक्षण
By admin | Updated: September 10, 2015 00:29 IST