अंबाजोगाई: शहरात गुरुवारी एकाच वेळी पाच पालख्यांचे आगमन झाले. यानंतर येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर अश्व रिंंगण सोहळा रंगला. यावेळी भाविकांची मांदियाळी जमली होती. यावेळी हरीनामाच्या गजरात भाविक दंग झाले होते. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात. या दिंडीतील वारकरी गेल्या चार वर्षापासून अंबाजोगाई येथे अश्व रिंंगण सोहळ्याचे आयोजन करतात. गुरुवारी सायंकाली नांदेड जिल्ह्यातील नरसी नामदेव यांची पालखी, गंगाखेड येथील संत जनाबाई यांची पालखी, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील संत महंमद खान महाराज यांची पालखी तर अकोला येथील भाऊसागर माऊली यांची पालखी शहरात दाखल झाली. या दिंड्या शहरात आल्यानंतर त्यांना टाळ-मृदगासह विठुनामाच्या गजरात योगेश्वरी मैदान येथे आणण्यात आले. यावेळी ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर रिंंगण सोहळा पार पडला. या सोहळ्यात सजविलेला अश्व, भगवी पताका हाती घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. संत ज्ञानेश्वराने भिंत चालविलेल्या देखाव्याची भाविकांनी प्रशंसा केली. वारकऱ्यांच्या कुस्त्या, महिलांच्या फुगड्या व मैदानी खेळ यात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी रिंंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, दिलीप सांगळे, अंकुशराव काळदाते, प्रकाश बोरगावकर, सुधाकर महाराज शिंदे, बालाप्रसाद बियाणी, डॉ. राजेश इंगोले, प्रशांत अदनाक, केशव ढगे, ललीत तोष्णीवाल, मुन्ना सोमानी, सुनील मुथ्था, विनोद निकम यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
अश्व रिंगण सोहळ्यात भाविकांची मांदियाळी
By admin | Updated: June 27, 2014 00:09 IST