बीड / आष्टी : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. आष्टी तालुक्यात रात्री चक्रीवादळ सुरू झाले. या वादळाने अनेकांना बेघर केले. शनिवारी दिवसभर वातावरणात गरमी निर्माण झाली होती. रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरूवात झाली. बीड शहर व परिसरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले. गेवराई येथेही हलक्या सरी झाल्या. दरम्यान, आष्टी तालुक्यातील साकत, कडा, दादेगाव, केरूळ, बेलगाव, मांडवा, डोईठाण या परिसरात चक्रीवादळाचा तडाखा बसला. सांगवीपाटण येथे चार घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे सदरील कुटुंबियांचा संसार उघडयावर पडला. धामणगाव येथे संत्री, मोसंबीच्या बागांना फटका बसला. देवी निमगाव येथेही काहींच्या घरावरील पत्रे उडाली. विद्युत तारा तुटल्याने पुरवठाही विस्कळीत झाला. त्यामुळे अनेक गावे अंधारात होती, असे सरपंच बिटू पोपळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
आष्टी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
By admin | Updated: March 15, 2015 00:18 IST